नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नामपूर येथील हिरा हॉस्पिटलचे संचालक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सी. एन. पाटील, जिप सदस्या सुनीता पाटील यांच्या डॉक्टर मुलाचा आणि डॉक्टर जावयाचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या दोघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना काळात डॉ. सी. एन. पाटील यांनी नागरिकांची अविरत सेवा केली आहे. गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉ. पाटील यांची नाशिकमध्ये ओळख आहे. परंतु डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
डॉक्टर मुलाचा काविळमुळे दुर्दैवी मृत्यू..
डॉ. सी. एन. पाटील यांचा मुलगा डॉ. आदित्य चिंतामण पाटील याने लातूर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेतली होती. तो आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करत होता. सुमारे 20 दिवसांपूर्वी त्याला काविळची लागण झाली होती. आदित्यला उपचारासाठी आधी मालेगावला आणि त्यानंतर नाशिकला हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुःखद मृत्यू झाला आहे. मोसम तीरावरील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉक्टर जावयाचा डेंग्यूने घेतला जीव..
डॉ. सी. एन. पाटील यांचे जावई निवृत्त वन अधिकारी वामनराव खैरनार यांचे चिरंजीव डॉ. विजय वामनराव खैरनार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.