मुंबई : सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय नेते वरिष्ठ नेत्यांकडे तिकिटासाठी फिल्डींग लावत आहेत. सध्या शरद पवार यांच्या भेटीसाठी इच्छुक उमेदवारांची रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता आपल्याला सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू आहे.
दरम्यान, शरद पवारांचे विश्वासू शिलेदार राहिलेल्या छगन भुजबळ यांनीही ऐनवेळी अजित पवारांची साथ देत मंत्रिपद स्वीकारले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरूद्धही शड़्डू ठोकण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन येवला मतदारसंघासाठी उमेदवारी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुणाल दराडे हे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे आणि त्यांचे पुतणे कुणाल दराडे आणि जयंत पाटील यांच्यात वीस मिनिटं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. कुणाल दराडे आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आज कुणाल दराडे यांनी भेट घेतल्याने दराडे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारण, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा मिळाल्यास कुणाल दराडे तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता आहे.