अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथून तब्बल एक कोटी रुपयांची वाळूची चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण सोपान गागरे, शुभम रेवजी गागरे व विमल रामचंद्र गागरे (सर्व रा. मांडवे खुर्द), दत्तात्रय रोडे व सचिन शिंगोटे (रा. खडकवाडी, पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मांडवे खुर्द येथील विमल रामचंद्र गागरे यांच्या शेत जमिनीतील गट नंबर ६१७ मधून १२९७ ब्रास वाळूची चोरी झाल्याची फिर्याद तलाठी दत्तात्रय झुंबर शिंदे यांनी पारनेर पोलिसात दिली आहे. पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी या वाळू चोरीचे सोशल मीडियावरील फुटेजनुसार तलाठी दत्तात्रय शिंदे यांना गुन्हा नोंदवण्यासाठी सांगितले होते. पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
महसूलमंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी
दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पारनेर तालुक्यात लक्ष असून देखील याच तालुक्यात मोठी वाळूचोरी झाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांडवे खुर्द येथील विमल रामचंद्र गागरे यांच्या शेत जमिनीतील गट क्रमांक ६१७ मधून तब्बल १२९७ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. बाजारभावा प्रमाणे या वाळूची किंमत तब्बल १ कोटी १ लाख १६ हजार ६०० रूपये इतकी होते.