नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी नाशिकमध्ये पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले . मराठ्यांनो यांच्या कोणत्याही भुलपाथांना बळी पडू नका, अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत राज ठाकरेंनी काय झालं म्हणत सरकारचे चांगलेच वाभाडे काढले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, मी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सांगितले की, मराठा आरक्षणाबाबत काही होणार नाही. ते तांत्रिकदृष्ट्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही, त्याचे आश्वासन राज्य सरकारकडून दिले जात आहेत. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण आणि रोजगार देऊ शकत नाही. बाहेरच्या राज्यातील लोक पोसायची आणि आम्ही आंदोलन करायची. सध्या जातीजातीत विष कालवण्याचे काम सुरु आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत राज ठाकरे म्हणाले की, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही?, पंतप्रधान नरेंद्र मोदी फुले वाहून गेले, त्याचे पुढे काय झाले? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला, तेव्हा मी सांगितले होते की हे काम होऊ शकत नाही. कारण समुद्रामध्ये भर घालण्यासाठी किमान 25 ते 30 हजार कोटी लागतील. शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले हे त्यांचे खरे स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला फक्त पुतळे दाखविणार का? जर गड किल्ले चांगल्या स्थितीत उभे राहिले, तर आपण इतिहास दाखवू शकू. काँग्रेस, शिवसेना-भाजप आणि आताचे सरकार ज्या गोष्टी होणार नाहीत, त्याच सांगत आहे, अशी खरपूस टीका त्यांनी केली.