नाशिक: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पिंपळगाव (Nashik News) जलाल टोल नाक्यावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्ग पोलिसांनी ट्रक चालकाकडून पैसे मागितले आणि पैसे न दिल्याने ट्रक जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांनी एक मालवाहू ट्रक अडवला. या वेळी पोलिसांनी चालकाकडे 30,000 रुपयांच्या दंडाची मागणी केली. तसेच, “दंड नको भरू, आम्हाला 5,000 रुपये दे,” अशीही मागणी केल्याचा आरोप ट्रक चालकाने केला आहे.

मात्र चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांसोबत त्याचा वाद झाला. या वादानंतर पोलिसांनी चालकाला मारहाण केली आणि त्याचा ट्रक पेटवून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ट्रक चालकाने दिलेल्या माहितीनुसार, तो पुण्याहून पंजाबमधील भटिंडा येथे जात होता. ट्रकमध्ये आर्मीचे साहित्य असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी नो-एंट्रीचे कारण देत दंडाची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्यावर एका पोलिसाने त्याला मारहाण केली. त्याच वेळी एका पोलिसाच्या हातातील सिगारेटमुळे ट्रकला आग लागल्याचा दावा चालकाने केला आहे.
आग लागल्यानंतर येवला येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत ट्रकमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला होता. ट्रक चालकाने या घटनेचा व्हिडिओ असल्याचा दावा करत महामार्गावर पोलिसांकडून ट्रक चालकांकडून पैसे उकळले जात असल्याचाही आरोप केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून सत्य काय आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.







