पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आशा पडरी गावातील अमन तिवारी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याने अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA यांना मेसेज पाठवून पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याच्या बदल्यात मोठ्या रकमेची मागणी केली होती. हा कट पूर्ण करण्यासाठी त्याने 22 दिवसांचा अवधीही मागितला होता.
या संदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर बक्सर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. पोलीस अधीक्षक शुभम आर्य यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून आरोपींना पकडण्यात आले.
तपासादरम्यान आरोपी अमन तिवारीची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली आहे. यापूर्वी त्याने कोलकाता विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली होती, त्या प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. या उपकरणांचा वापर करूनच CIAला मेसेज पाठवण्यात आल्याचा संशय आहे. या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमन तिवारी हा साध्या कुटुंबातील असून त्याचे वडील पुजारी आहेत. जास्त पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्याने हा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.







