अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील जेलमधून पळून गेलेल्या कैद्यांना साथीदाराच्या मदतीने नेपाळला जायचा प्लॅन होता. मात्र एका टपरीवर भजे खायला थांबले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्या सहाजणांकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, जिवंत काडतूससह सहा मोबाईल आणि चारचाकी वाहन असं मिळून तब्बल दहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राहुल देविदास काळे, रोशन उर्फ थापा रमेश ददेल, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबु ढोले यांच्यासह वाहनचालक मोहनलाल नेताजी भाटी (रा. वडगांव शेरी, जि. पुणे), अल्ताफ आसिफ शेख (रा. कुरण ता. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गट रचने, जिवे मारण्याचा प्रयत्न, जेल तोडून पळून जाणे या गंभीर स्वरूपाचा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की वरील कैदी आठ नोव्हेंबर रोजी सकाळी उपकारागृहाच्या मराठीचे गज तोडून पळाले होते. घटना घडल्यानंतर लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक शोधासाठी रावना झाले. कारागृहाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. जेल तोडून पळालेले पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून पळाले असल्याची माहिती बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली.
भजे खायला थांबले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले
संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून पळून गेलेले कैदी नेपाळला जाण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांना याची खबर लागल्याने पोलीस पथकाने जळगावच्या दिशेने धाव घेत जामनेर परिसरातील शांतीसागर हॉटेल, दुकानदार यांना आरोपीचे फोटो दाखवून माहिती घेतली असता, एका चहाच्या टपरीवर भजे आणि चहा खाल्याचे समोर आले. त्यांच्याकडे पैसे नसल्याने टपरी चालकाच्या फोनवरून एकाला फोन करून दोन हजार रुपये मागून घेतले आणि उर्वरित पैसे टपरी चालकांकडून त्यांनी घेतले. स्थानिक नागरिकांकडे अधिक तपास करत असताना पोलिसांना त्याच्या शेतात असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने शेतामध्ये जाऊन आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी संगमनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
संगमनेरच्या कारागृहातून आठ नोव्हेंबरला गज कापून चार कैदी पळाले होते. ही घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कोपरगाव कारागृहाचे काम सुरू असून कोपरगाव व शिर्डीमधील मोठ्या गुन्ह्यातील अनेक कैदी संगमनेरच्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
संगमनेर कारागृहाच्या बंदोबस्तासाठी बुधवारी पहाटेपर्यंत जेल गार्ड म्हणून संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे राजू गोडे, घारगावचे पोलिस कर्मचारी राजेंद्र मेंगाळ आणि महिला पोलिस कर्मचारी भांगरे यांची कारागृह रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पोलिस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री कैदी मोजली असता संख्या बरोबर होती. पलायन करणाऱ्या कैद्यांनी पोलिसांनी कारागृहातील कैदी झोपेत असताना कारागृहाचे गज कापून बुधवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कैदी पळाले होते.