भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याचा आरोप होत असून यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे हे चार वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जानेवारी 2026 पासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या काळात सर्वसामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नाही. हजारो किलोमीटर पायी किंवा सायकलने वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे.

अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे सामान्य भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्य भाविकांसाठी बंद का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत भाविक प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, “बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आपल्या महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या कामासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे. पण भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी हे मंदिर खुले करण्यात आले. हे निशिकांत दुबे कोण आहेत माहिती आहे का? जे नेहमी मराठी माणसाला कमी लेखतात आणि मराठी माणसांबद्दल चुकीची वक्तव्ये करतात. एकदा ते म्हणाले होते की ‘मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे’. आज त्याच निशिकांत दुबे यांच्यासाठी महाराष्ट्रातील प्रशासन पायघड्या घालत आहे. सामान्य माणसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे यांना वेगळा न्याय का? दुबे काय तुमचा जावई आहे का?”
या वक्तव्यानंतर भीमाशंकर मंदिरातील व्हीआयपी दर्शनाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रशासन किंवा मंदिर व्यवस्थापनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.







