नाशिक : लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये मंगळवारी लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपयांची घसरण झाली. श्रीलंका सरकारने कांदा आयात शुल्कात मोठी कपात केल्यामुळे त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा असताना दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने बहुतांश शेतकऱ्यांनी माल बाजारात आणल्याने आवक वाढली असून, त्यामुळे दर कोसळल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव या प्रमुख बाजार समित्यांमध्ये गत आठवड्यात उन्हाळ काद्याला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. मंगळवारी त्यात मोठी घसरण झाली. एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने फवारणीचा खर्च वाढत आहे.
त्यातच विक्रीसाठी तयार असलेल्या कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी २१ हजार २३८ क्विटल लाल कांद्याची आवक झाली. त्यास किमान ५३५२, तर सरासरी ३७५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी (दि.२) २३ हजार ९९४ क्विटल मालाची आवक होऊन त्यास कमाल ५४५५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. तर पिंपळगाव बाजार समितीत मंगळवारी (दि.३) ९६२ वाहनांतून कांद्याची आवक होऊन त्यास कमाल ४५९९ व सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी ९५१ वाहनांतून कांद्याची आवक होऊन त्यास किमान ५३०० व सरासरी ३८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा आता संपला असून, लाल कांद्याची आवक हळूहळू वाढू लागली आहे.
जिल्ह्यातील एकंदरीत दर (प्रतिक्विंटल) गत आठवड्यात – कमीत कमी : १५००, जास्तीत जास्त ५५००, सरासरी : ४३००
मंगळवारी (दि. ३) (प्रतिक्विंटल), कमीत कमी : १०००, जास्तीत जास्त : ५१०१, सरासरी : ३५०