मनमाड : सुमारे दीड महिन्याच्या चिमुकलीला रेल्वेतील शौचालयात टाकून तिचे निर्दयी पालक फरार झाल्याचा प्रकार रविवारी (दि. ९) उत्तररात्री १ वाजेच्या सुमारास सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये (१७०५८) घडला. चिमुकलीला सोडून जाणाऱ्या तिच्या आईविषयी ‘माता न तू वैरिणी’ अशा शब्दांत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. मनमाड रेल्वे पोलिसांनी बालिकेला ताब्यात घेतले असून, तिच्या आई-वडिलांचा तपास सुरू आहे. एकीकडे अपत्यप्राप्तीसाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे मात्र काही पालकांना पोटचे गोळे नकोसे झाल्याने त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे प्रकार वाढले आहेत.
याबाबत माहिती अशी की, देवगिरी एक्सप्रेस छ. संभाजीनगर रेल्वेस्थाकातून निघाल्यानंतर एका वातानुकूलित डब्याच्या स्वच्छतागृहातून लहान बाळाच्या रडण्याचे आवाज ऐकू आल्याने प्रवाशांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी अवघ्या दीड महिन्याच्या बालिकेला स्वच्छतागृहात ठेवल्याचे निदार्शनास आले. प्रवाशांनी बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेतला. मात्र, मनमाड स्थानक येईपर्यंत या बाळाच्या पालकांचा शोध न लागल्याने अखेर प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्या चिमुकलीला मनमाड स्थानकात उतरविण्यात आले. या बालिकेला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन याबाबत कायदेशीर कार्यवाही करून सोमवारी (दि. १०) सकाळी नाशिकच्या टिळकवाडी येथील बालसुधारगृहात रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.