नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दीड लाख महिलांचे अर्ज दाखल झालेले आहेत. तर, सुमारे एक लाख दहा हजार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून त्या दीड हजार रुपयांचा लाभ घेत असल्याने लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरत आहेत.
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यापासून महिलांमध्ये कागदपत्रे जमविण्याची धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४४ हजार महिलांनी ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात नोंदणी केली आहे. परंतु, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, श्रावणबाळ, दिव्यांगांना पेन्शन या चार योजनांमार्फत महिन्याला साधारणतः दीड हजार रुपये दिले जातात. नाशिक शहरात या योजनांचे १० हजार २६० लाभार्थी आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात एक लाखावर लाभार्थी असल्यामुळे एक लाख दहा हजारांवर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
याशिवाय ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखपिक्षा अधिक आहे, कुटुंबातील सदस्य करदाता आहे, सरकारी नोकर, निवृत्तीवेतन घेणारेही अपात्र ठरणार आहेत. परंतु, बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेस अपात्र ठरणार आहेत. कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहने नावावर असल्यास (ट्रॅक्टर वगळून) अपात्र ठरणार आहेत. महिला, मुलींना सुविधा देताना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यामुलांच्या आरोग्य, पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने या योजना राबविल्या जात आहेत.