नाशिक: नाशिकमध्ये कॉर्पोरेट कंपनीत महिलांवर (Nashik News) अत्याचार होत असल्याच्या प्रकरणाने (Gopichand Padalkar) मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा सुरू असून आता याला पुण्याशी जोडणारे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून हे सर्व आरोपी पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, नाशिकमधील कंपनीत काम करणाऱ्या काही महिलांना मुद्दाम लक्ष्य केले जात होते. त्यांना कामाच्या निमित्ताने बाहेर नेऊन त्यांच्यावर लैंगिक आणि मानसिक अत्याचार केले जात होते.

तक्रारीनुसार, काही महिलांना जबरदस्तीने धार्मिक गोष्टी पाळायला लावल्या जात होत्या. तसेच त्यांच्यावर दबाव टाकून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये महिलांना धमक्या देण्यात आल्या. फोन न उचलल्यास त्यांच्या कुटुंबियांना फोन करून त्रास दिला जात होता.
या प्रकरणात नऊ महिलांनी पुढे येऊन तक्रार दिली आहे. या तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटना 2022 पासून सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही महिलांनी त्रासाला कंटाळून नोकरी सोडल्याचेही समोर आले आहे.
गोपिचंद पडळकर यांनी या प्रकरणाला मोठ्या रॅकेटशी जोडले असून पुण्यातील आयटी क्षेत्रातही अशाच प्रकारची शक्यता असल्याचे म्हटले आहे. या मुलींना परदेशात विकण्याचा प्लॅन होता असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे पुण्यातील कंपन्यांचाही तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. संबंधित कंपनीत सुमारे 130 कर्मचारी काम करत असून त्यापैकी आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणामागे मोठे जाळे आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.







