पुणे: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका 27 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि इतर नातेवाईकांकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तिने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दीप्ती प्रदीप एकशिंगे (वय 27, रा. मणिकबाग, सिंहगड रोड) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ डॉ. किरण तुषार दुधबळे (रा. चार्मोशी, जि. गडचिरोली) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पती प्रदीप विठ्ठल एकशिंगे, सासू सुरेखा विठ्ठल एकशिंगे आणि इतर नातेवाईकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती ही मूळची गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथील रहिवासी होती. ती आणि प्रदीप हे दोघेही एका आयटी कंपनीत कार्यरत होते. नोकरीदरम्यान झालेली ओळख पुढे प्रेमात बदलली आणि 17 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांनी प्रेमविवाह केला.
मात्र लग्नानंतर परिस्थिती बदलली. मूल होत नसल्याच्या कारणावरून पती आणि सासू वारंवार तिचा छळ करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शारीरिक मारहाण, टोमणे आणि मानसिक त्रासामुळे दीप्ती तणावाखाली होती. अनेकदा तिला अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या सततच्या छळाला कंटाळून दीप्तीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे आयटी क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून विवाहित महिलांवरील मानसिक छळाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.







