पुणे: पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत असून, सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्य टोळीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात फसवणुकीत वापरण्यासाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हडपसर पोलीस ठाण्यातील हवालदार माधुरी डोके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित खातेदाराने पैशांच्या मोबदल्यात स्वतःचे बँक खाते सायबर गुन्हेगारांना वापरण्यास दिले होते. तपासात या खात्याच्या माध्यमातून चौघांची मिळून १ कोटी ३२ लाख ७९ हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, वाघोली परिसरात ४६ वर्षीय महिलेला आयपीओ (IPO) मध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. मोठ्या नफ्याच्या आशेने महिलेने ऑनलाईन गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता संपर्क तोडला.
कोथरूडमधील ५६ वर्षीय व्यक्तीलाही सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांना एक अज्ञात ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले आणि विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ४ लाख १३ हजार रुपये उकळण्यात आले.
दोन्ही प्रकरणांमध्ये सुरुवातीला मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपये स्वीकारून आरोपींनी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, हडपसर पोलीस या आंतरराज्य सायबर टोळीचा शोध घेत आहेत.






