नाशिक : पुण्यातून वारंवार हिट अॅँड रनची प्रकरणं समोर येत असताना आता नाशिकमधूनही असंच प्रकरण समोर आलं आहे. दारुची अवैध वाहतूक करणा-या क्रेटा कार वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग करतांना नाशिकच्या चांदवड-मनमाड रोडवरील हरणूल शिवारात राज्या उत्पादन शुल्क विभागाच्या वाहन अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर पथकातील तीन कर्मचारी गंभीर जखमी असून त्यात लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड परिसरामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलिस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनात संबंधित अधिकारी व कर्मचारी या ट्रकचा पाठलाग करत होते. यावेळी लासलगाव-चांदवड रस्त्यावर असलेल्या हरनुल या ठिकाणी अपघात झाला. ही घटना रविवारी (ता.7) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.
या अपघातात सीमा शुल्क विभागाचा वाहनाचा चक्काचूर झाला. तसेच चालक कैलास कसबे हे जागीच ठार झाले आहेत. तसेच जवान राहुल पवार व लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन कॉन्स्टेबल अरुण बाळासाहेब डोंगरे व शशिकांत देविदास निकम हे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक शशिकांत गर्जे, नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पथक दाखल झाले.