माळशिरस : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यातील सभेत शरद पवार यांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, माढ्यात पंधरा वर्षांपूर्वी एक मातब्बर नेता निवडणूक लढण्यासाठी आला होता.
त्यावेळीचे लोक सांगतात की, या बड्या नेत्याने तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने माढ्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्याची शपथ घेतली होती. मात्र, त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. मग अशा लोकांना तुम्ही शिक्षा देणार नाही का? त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी माढ्याच्या सभेत शरद पवार यांना उद्देशून केलं.
नरेंद्र मोदी म्हणाले, देशात काँग्रेसचे सरकार असताना येथील मातब्बर नेते देशाचे कृषीमंत्री होते. तेव्हा ऊसाच्या एफआरपीचा दर २०० रुपये इतका होता. मात्र, आज मोदी सरकारच्या काळात उसाचा एफआरपी प्रतिक्विंटल ३४० रुपये इतका आहे. हा मातब्बर नेता कृषीमंत्री होता तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकलेल्या बिलांचे पैसे मिळवण्यासाठी साखर आयोगाच्या कार्यालयात हेलपाटे मारायला लागत होते.
मात्र, आज देशात ऊसाचा थकित एफआरपी १०० टक्के दिला जातो. २०१४ मध्ये ऊसाच्या थकित एफआरपीसाठी ५७ हजार कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली होती. यंदा हीच रक्कम १ लाख १४ कोटी इतकी आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.