राजेंद्रकुमार शेळके
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळा चिंचला येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी ग्रामपंचायत गोदुंणेच्या माध्यमातून परिसरात वनराई बंधारे बांधत सामाजिक बांधिलकी जपली आहे. हा परिसर संपूर्ण डोंगराळ भाग असून या भागात भरपूर पाऊस पडतो. मात्र, साठा नसल्याने सगळ पाणी गुजरात राज्यात वाहून जाते. त्यासाठी वाहत जाणारे पाणी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी अडवून छोटे-छोटे बंधारे बांधले आहेत.
यामुळे पाणी जमिनीत जिरून परिसरातील शेतकऱ्यांचे विस्कळलेले जीवन काही अंशी सुधारण्यास मदत होईल, तसेच शेतकरी आपल्या पिकांना जीवदान देतील. शिवाय जनावरांना देखील याचा फायदा होणार आहे. या उपक्रमामुळे परिसरात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे नागरिक कौतुक करत आहेत.
दरम्यान, या उपक्रमासाठी ग्रामपंचायत गोदुंणे गावच्या सरपंच श्रीमती संध्याताई खंबाईत तसेच उपसरपंच कमलेश राऊत यांचे विशेष सहकार्य मिळाले. आश्रमशाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बंधारा बांधण्यास विद्यार्थ्यांना मदत केली. तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेसीपी आणि इतर साधनांची उपलब्धता करून दिली.