पाचोरा : परदेशात रशिया व युक्रेनचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. त्यात इस्त्रायल गाझा पट्टीत दहशतवादी संघटनांकडून हल्ले करण्यात येत असून, जणूकाही तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात असल्याचे दिसून येत आहे. परंतु, या गाझा पट्टीत होत असलेल्या हल्ल्याच्या समर्थनार्थ व विरोधात ठिकठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आहेत. पाचोरा शहरात इस्त्रायल बायकॉटचे पोस्टर्स झळकले होते.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून तातडीने शोध सत्र राबविण्यात येत पोस्टर काढण्यात आले आहे. काही इस्राईलविरोधात बॅनरबाजी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिस यंत्रणेने अलर्ट मोडवर येऊन बॅनर काढून बॅनरबाजी करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईलवर हल्ले करून प्रचंड जीवित व वित्तहानी केली. या प्रकारानंतर काहींनी इस्राईलला पाठिंबा दिला, तर काहींनी हमास संघटनेचे समर्थन केले. या क्रिया-प्रतिक्रियांचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोचले असून, पाचोरा येथे रात्री देशमुख वाडी भागातील हुसैनी चौक परिसरात ‘इस्राईल बॉयकॉट’ लिहिलेले बॅनर लावण्यात आले.