जळगाव: कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचा एक धक्कादायक प्रकार जळगावातील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात समोर आला आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या 3 तरुणांना अमानुष मारहाण केली आणि त्या तिघांना एकमेकांसोबत अश्लील चाळे करण्यास भाग पाडले. या गंभीर प्रकारामुळे पोलिस दलाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर तातडीने कारवाई करत संबंधित उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडाला निलंबित करण्यात आले आहे.

एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी तपास करत असताना, उपनिरीक्षक नार्हेडा यांनी काही संशयित तरुणांना पोलिस ठाण्यात बोलावले. मात्र, चौकशीच्या नावाखाली त्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. नार्हेडा यांनी या तरुणांना कपडे काढायला लावून अमानुष मारहाण केली. तिघांना एकमेकांसोबत गैरवर्तन करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर या घटनेची तक्रार पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी आणि एकलव्य संघटनेने थेट पोलिस अधीक्षकांकडे केली. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी तरुणांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कारवाई करत संबंधित उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडाला निलंबित करण्यात आले आहे.








