पुणे: पुण्यात ‘स्पा’च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कठोर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कठोर पाऊल उचलले आहे. ‘धनराज’, ‘प्रिया’ आणि ‘अनुज’ हे त्रिकुट गेल्या काही काळापासून शहरात वेश्याव्यवसायाचे मुख्य सूत्रधार बनले आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली 100 हून अधिक स्पा सेंटर चालतात. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे पोलीस यंत्रणा अजूनही या मुख्य गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. कारवाई फक्त स्पाच्या व्यवस्थापकांवर होते, तर हे सूत्रधार मोकळे फिरत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांकडून पोलिसांची कारवाई निवडक आणि प्रभावहीन असल्याचा आरोप केला जात आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका कारवाईत 15 वर्षांची एक अल्पवयीन मुलगीही या व्यवसायात आढळली होती. त्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही टोळी अतिशय हुशारीने काम चालवत आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधार अजूनही सुरक्षित आहेत. पुण्यात अनेक स्पा पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. सोशल मीडियावर ‘मसाज, स्पा’, ‘रिलॅक्सेशन सेंटर’ अशा नावांनी या व्यवसायाची खुलेआम जाहिरात केली जाते. याच परिस्थितीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ‘धनराज’, ‘प्रिया’ आणि ‘अनुज’ या तिघांवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे खुले आव्हानच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. जो अधिकारी ही कारवाई करून दाखवेल, त्याला बक्षीस देण्याची घोषणाही आयुक्तांनी केली आहे.








