पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील गोलेगावचे सुपुत्र आणि सध्या बीड जिल्ह्यातील गेवराई येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनिल कटके यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे गोलेगावसह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अनिल कटके यांनी आपल्या पोलीस सेवेदरम्यान अनेक जिल्ह्यांत जबाबदारी सांभाळली आहे. मुंबई, नंदुरबार, पुणे, सांगली, अहिल्यानगर आणि हिंगोली येथे त्यांनी काम केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावताना कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देत त्यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली.

पोलीस दलातील जबाबदारी पार पाडताना धाडसी वृत्ती आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती बांधिलकी जपल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. त्यांना मिळालेला राष्ट्रपती पदकाचा सन्मान हा त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव मानला जात आहे.
गोलेगावसारख्या गावातील व्यक्तीने पोलीस दलात काम करताना महत्त्वाचा सन्मान मिळवल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. कटके यांच्या यशामुळे गावाची मान उंचावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनीही अनिल कटके यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.






