पुणे: मित्राच्या पैशांच्या व्यवहारातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. पुण्यातील पाषाण परिसरात झालेल्या हल्ल्यात सहदेव रामप्रकाश शर्मा (वय 33, रा. सूस गाव) यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा आयटीआय मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी बंटी उर्फ आशिष चक्रनारायण याच्यासह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेवचा मित्र ज्ञानेश्वर भोई याने बंटी नावाच्या व्यक्तीकडून 3 लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम परत करण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी सहदेव मध्यस्थी करत होता. मात्र, पैशांच्या व्यवहारावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर पुढे हिंसक हल्ल्यात झाले.

रविवारी रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास सहदेव आणि त्याचा मित्र ओंकार डोईफोडे आयटीआय मैदान परिसरात गेले होते. त्यावेळी आरोपीही तेथे आले. पैशांच्या प्रकरणात सहदेव हस्तक्षेप करत असल्याने त्यांच्यात वाद झाला. तसेच सहदेवने आरोपीच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरल्याचा गैरसमज झाल्याने वाद आणखी वाढल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यानंतर आरोपींनी सहदेवला मारहाण केली. त्याने प्रतिकार केल्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेला सहदेव रस्त्यावर कोसळला. तरीही आरोपींनी त्याला फुटपाथवर ओढून नेले आणि पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
जखमी सहदेवला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सहदेवचा भाऊ कृष्णा रामप्रकाश शर्मा (वय 36, रा. सूस गाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार बाणेर पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






