सागर जगदाळे

भिगवण (प्रतिनिधी): एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट, तर दुसरीकडे विजेचा लपंडाव! घाम गाळून, प्रसंगी पदरमोड करून पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली पिके आता डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. तोंडाशी आलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी वीजच उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर भविष्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी उभे केलेले पीकही डोळ्यांसमोर जळून जाण्याची वेळ आल्याने बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याऐवजी वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींत भर पडत असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निंबोडी ग्रामपंचायतीने महावितरण प्रशासनाला निवेदन देत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून, प्रश्न न सुटल्यास १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पारवडी सबस्टेशनसमोर ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सिद्धेश्वर निंबोडी, (ता.बारामती) येथील गावात सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लोडशेडिंग होत असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे. याशिवाय, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतीसह दैनंदिन जीवनही विस्कळीत होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विजेच्या अनियमित वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. परिणामी, आधीच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.

पिके जगवायची कशी, जनावरांना चारा घालायचा कुठून?
शेतकऱ्यांसाठी पिके म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन नसून, संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो. पेरणीपासून मशागतीपर्यंत केलेला खर्च, घेतलेले कष्ट आणि उराशी बाळगलेली अपेक्षा आता पाण्याअभावी धोक्यात आली आहे. पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना पाणी देता येत नसेल, तर वर्षभराची मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. विशेषतः जनावरांसाठी लावलेला चारा जळून गेल्यास आगामी काळात पशुधन जगविण्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. त्यामुळे केवळ वीजपुरवठ्याचा प्रश्न म्हणून याकडे न पाहता, शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी आणि पशुधनाच्या अस्तित्वाशी निगडित समस्या म्हणून गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
पाणीपुरवठाही विस्कळीत; विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम
गावातील पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपांना पुरेशी वीज मिळत नसल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळेत वीज उपलब्ध नसणे, तसेच दिवसभरात वीज येण्याच्या आणि जाण्याच्या अनिश्चित वेळा यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार ग्रामपंचायतीने केली आहे. सिंगल फेज वीजपुरवठाही नियमित नसल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महावितरणने नियोजन करावे; अन्यथा आंदोलन
वीजपुरवठ्याच्या अनियमिततेला आळा घालून शेतीसाठी आवश्यक वीज योग्य वेळेत उपलब्ध करून द्यावी, वीजपुरवठ्याचे नियोजन पारदर्शक व नियमित करावे आणि वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यातून शेतकऱ्यांची सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर सरपंच संतोष मोहन सोनवणे यांची स्वाक्षरी असून, निवेदनाच्या प्रती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, महावितरणच्या बारामती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.विजेच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांची पिके हातची गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, की पिके आणि चारा वाचविण्यासाठी वेळेत वीजपुरवठ्याचे नियोजन करणार? याकडे लक्ष लागले आहे.







