सोलापूर : मुलीचे लग्न जुळवून देण्याचे आणि पत्नीला उपसरपंच बनवण्याचे आश्वासन देऊन एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भोंदू मनोहर भोसले याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांच्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर भोसले याच्याविरोधात नोंद झालेला हा सातवा गुन्हा असल्याचे वृत्त आहे.

पुणे जिल्ह्यातील एका व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मुलीच्या लग्नाबाबत माहिती मिळावी, या अपेक्षेने संबंधित व्यक्ती मनोहर भोसले याच्याकडे गेली होती. त्यावेळी त्याने सहकारी विशाल वाघमारे याच्यामार्फत तक्रारदाराकडून सुरुवातीला 5,000 रुपये घेतले. त्यानंतर मुलीचे लग्न होईल आणि पत्नीला उपसरपंचपद मिळेल, असे आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर पूजा करण्याच्या नावाखालीही पैसे घेतल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. 5 अमावस्यांना विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून त्याच्याकडून आणखी 1 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे वेगवेगळी आश्वासने देत पैसे घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, मनोहर भोसले याच्या मुलांच्या शिक्षणासाठी मांजरी परिसरातील साई बालाजी इमारतीत मस्के यांच्या मालकीचे 2 फ्लॅट भाड्याने घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घरांचे भाडे आणि डिपॉझिटची रक्कम तक्रारदाराने भरावी, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, संबंधित फ्लॅटचे 63 महिन्यांचे भाडे आणि अनामत रक्कम मनोहर भोसले याने दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात तक्रारदाराचे 8 लाख 61 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मनोहर भोसले याच्याविरोधात यापूर्वी फसवणूक आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल असल्याचे वृत्त आहे. आता करमाळा पोलिस या नव्या प्रकरणाचा तपास करत आहेत.






