कोल्हापूर : जिल्ह्यातील किणी टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. ऊसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी हजारो शेतकरी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडून बसले आहेत. 3 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून हजारो प्रवासी आणि मालवाहू वाहने अडकून पडली आहेत.

चालू गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन 4,200 रुपये पहिली उचल मिळावी, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 50 रुपये आणि इथेनॉलचा दर प्रति लिटर 70 रुपये करण्याची मागणीही संघटनेने लावून धरली आहे. ऐन दिवाळीच्या सणात हे आंदोलन सुरू असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. महामार्गावरील कोंडी लक्षात घेता पोलिसांनी कराड, पेठ नाका, सांगली फाटा, टोप आणि कागल यांसारख्या मार्गांवरून वाहने वळवली आहेत, तरीही वाहतुकीचा ताण कायम आहे.
या आंदोलनाचा मोठा फटका सार्वजनिक वाहतूक आणि दूध वितरणाला बसला आहे. कोल्हापूर विभागातील एसटीच्या सुमारे 166 फेऱ्या रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे तब्बल 5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, मुंबई आणि पुण्याला जाणारे दुधाचे टँकर अडकल्यामुळे ‘गोकुळ’ दूध संघाच्या वितरणावर 50 ते 60 टक्के परिणाम झाला आहे. दूध टँकर सुरक्षित बाहेर काढण्यासाठी गोकुळ प्रशासनाने पोलिसांकडे मदत मागितली आहे.

स्थानिक ग्रामस्थांकडून आंदोलकांसाठी जेवणाची सोय केली जात असून, इतर राजकीय आणि सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी प्रशासनाला आणि कारखानदारांना इशारा दिला आहे की, जर आज ऊसदारावर कोणताही तोडगा निघाला नाही, तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळला जाईल तसेच साखर कारखानदारांच्या घरांसमोर आंदोलन केले जाईल. त्यामुळे आता या समस्येवर प्रशासन कसा मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







