आदित्य बोराटे

इंदापूर: महात्मा फुलेनगर-बिजवडी (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची सन २०२६-२०३१ या कालावधीसाठीची निवडणूक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. कारखान्याच्या २१ जागांसाठी २१ उमेदवारांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी बुधवारी (दि. ४) केली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सर्व २१ जागांवर एकमताने निवड झाली आहे. यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील यांच्यासह विविध गटांतील उमेदवारांचा समावेश आहे.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : हर्षवर्धन शहाजीराव पाटील, राजवर्धन हर्षवर्धन पाटील, राकेश रमेशप्रसाद शुक्ल, रविंद्र वामन सरडे, शांतीलाल दत्तात्रय शिंदे, छगन धोडीबा भोगळे, निलेश शामराव देवकर, राजेंद्रकुमार प्रतापराव देवकर, संतोष लक्ष्मण काळे, श्रीकांत खिंवराव देवकर, विजय विठ्ठल खर्चे, पराग रमेशराव जाधव, रणजित नामदेव निकम, रोहित राजेंद्र गायकवाड, बिभीषण कल्याण नलवडे, अतुल शिवाजी शिगाडे, वसंत खंडू मोहोळकर, हरिश्चंद्र सदाशिव पारेकर, रत्नमाला संपत पवार, सुमन नारायण व्यवहारे आणि अमोल सुभाष जाधव.

या निवडणुकीत बिनविरोध निवडीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तसेच प्रदीप गारटकर, प्रवीण माने यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासदांचे सहकार्य लाभले. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी दाखविलेल्या सामंजस्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडण्यास मदत झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.






