दौंड, ता. 05 : पुणे जिल्ह्यासह सोलापुरातील पंढरपूर, करकंब या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, जबरी चोरी व वाहन चोऱ्या करणाऱ्या एका कुख्यात टोळीतील तीन आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 12 गुन्हे उघडकीस आले असून यामध्ये तब्बल 15 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

मोबाईल उर्फ हरी पवार (वय 22, रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर), शक्तिमान हृबऱ्या काळे (वय 22, रा. माळेगाव, ता. बारामती) व एक अल्पवयीन अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 01) पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज आणि त्यांच्या पथकाला इंदापूर परिसरात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित इंदापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुणे-सोलापूर बायपासवरील जगदंब हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच मोटारसायकलींवरून तीन जण तेथे आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान मोबाईल उर्फ हरी पवार आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील मोटारसायकलींबाबत चौकशी केली असता त्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले. युनिकॉर्न (एमएच 13 ईक्यू 4910) आणि स्प्लेंडर (एमएच 13 डीडब्ल्यू 2723) या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनांबाबत पंढरपूर आणि करकंब पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले. तसेच दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील मोबाईलही मिळून आला.

याशिवाय वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला. या प्रकरणात शक्तिमान हृबऱ्या काळे याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासोबत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात दरोड्याचा एक, जबरी चोरीचा एक आणि घरफोडीचे आठ, तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांच्या तपासातून सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण 15 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी चौकशीत दौंड पोलिस ठाण्यातील 2, इंदापूर 3, वालचंदनगर 3, भिगवण -1, वडगाव निंबाळकर -1 करकंब 1, पंढरपूर पोलिस ठाणे 1 असे 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, इंदापूरचे पोलिस निरीक्षक विलास नाळे, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते, सुधीर वाळुंज, बाळासाहेब कारंडे, विनोद भोकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, सचिन होळकर, गुलाबराव पाटील, स्वप्निल अहिवळे, पोपट नाळे, शैलेश स्वामी, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, गणेश डेरे, रहीस मुळानी, राजू मोमीन, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ, इंदापूर पोलिस ठाण्याचे अंमलदार संतोष शिंदे, अंकुश माने, राहुल शिंदे, लक्ष्मण सूर्यवंशी, योगेश कर्चे, विनोद लोखंडे, सचिन नांगरे, अण्णा कोळेकर व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडील पोलिस अंमलदार यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलिस करीत आहे.






