पुणे, ता. 13 : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावरून आता वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. निविदा प्रक्रिया, विकासकामे आणि आर्थिक व्यवहारांत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणाची दखल घेत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पणन संचालकांना चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कारभाराची सखोल तपासणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर आणि संचालक प्रशांत काळभोर यांनी संचालक मंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निविदा प्रक्रिया आणि विकासकामांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचा, तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

माजी सभापती दिलीप काळभोर यांनी बाजार समितीच्या निधीतून धनादेशाद्वारे मोठ्या प्रमाणात रकमा वितरित केल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. बाजार समितीच्या कारभारासंदर्भातील तक्रारींच्या चौकशीसाठी पणन संचालकांनी समिती नियुक्त केली आहे. मात्र, चौकशी सुरू असतानाही कथित नियमबाह्य आर्थिक व्यवहार आणि विकासकामे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे चौकशी निष्पक्ष आणि प्रभावी होण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

दुसरीकडे, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. बाजार समितीचा संपूर्ण कारभार पारदर्शक पद्धतीने सुरू असून, संचालक मंडळ कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय हेतूने निराधार आरोप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, आता पणन संचालकांच्या चौकशीत निविदा प्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि विकासकामांबाबत नेमके काय निष्पन्न होते, याकडे बाजार समितीच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






