पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच एक ऐतिहासिक स्मारक उभारले जाणार आहे. मोशी येथील बोऱ्हाडेवाडीत लवकरच 100 फूट उंचीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कांस्य पुतळा उभारण्यात येणार आहे. या भव्य पुतळ्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या स्मारकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘एआर’ आणि ‘व्हीआर’ या तंत्रज्ञानाद्वारे संभाजी महाराजांचा जीवनपट अधिक प्रभावीपणे दाखवले जाणार आहे. त्यांच्या शौर्यगाथा, संघर्ष, बुद्धिकौशल्य आणि धर्मनिष्ठा अशा अनेक बाबी ‘लेमन डिझाईन प्रा. लि.’ या एजन्सीच्या मदतीने दाखवल्या जाणार आहेत. दरम्यान, महापालिकेचे सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले की, हा भव्य पुतळा शहराच्या चारही बाजूंनी दिसणार आहे, ज्यामुळे शहराच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

भव्य स्मारकाची रचना आणि खर्च:

छत्रपती संभाजी महाराजांच्या कांस्य पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या दिल्लीतील फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आला आहे. पुतळ्याचे सुटे भाग इथे आणून जोडले जात आहेत आणि आत्तापर्यंत 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी 32 कोटी 84 लाख रुपये खर्च येत आहे. पुतळ्यासोबतच, 15 कोटी खर्चून 40 फूट उंचीच्या चौथऱ्याचे कामही पूर्ण होत आले आहे.

उद्यान आणि इतर सोयीसुविधा:
या स्मारकाच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक साहित्य आणि शस्त्रांचे एक खास संग्रहालय उभारले जाईल. यासोबतच, पुतळ्याभोवती मावळ्यांचे पुतळे, आकर्षक उद्यान, प्रेक्षक गॅलरी आणि विद्युत रोषणाईची व्यवस्थाही केली जात आहे. परिसरातील विद्युत कामे आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे कामही सुरू आहे.







