धुळे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती. नवाब मलिक आणि आम्ही 18 वर्षे सोबत काम केले आहे. सोयीप्रमाणे नाते जोडायचे आणि सोयीप्रमाणे नाते तोडायचे, हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील, पण आमचे नाही. एकदा नातं जोडलं की ते आयुष्यभर टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची आहे. असे खासदार सुप्रिया सुळे म्हटल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लबोल केला आहे.
भाजप हा पक्ष पूर्वी सुसंस्कृत होता : सुप्रिया सुळे
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या कि, भाजप हा पक्ष पूर्वी सुसंस्कृत होता. आता नवीन भाजपने महाराष्ट्र आणि देशात गलिच्छ राजकरण केलं आहे. महाराष्ट्र संविधानाने चालतो, कोणाच्याही मनमानीने चालत नाही. सत्ता, पैसा, पद या गोष्टी येतात आणि जातात. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा, आशा स्वयंसेवक महिलांना पाच हजार देतो म्हणाले होते, अद्याप त्यांना पैसे दिले नाहीत. येत्या पाच दिवसात जर आशा वर्कर महिलांना पाच हजार रुपये मिळाले नाहीत, तर मी आंदोलन करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी ठकावून सांगितले.
हे सरकार खोक्यांचे आहे..
हे सरकार खोक्यांचे आहे. 50 खोके घेऊन हे सरकार तयार झाले आहे. ते पैशाने विकले गेले असतील. पण महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. मी माझं काम पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवलं. आपल्याकडे ईडी सीबीआय असली भानगड नाही. या सरकारनं लाडकी बहिण योजनेच्या जाहीरतीसाठी 200 कोटी रुपये खर्च केला आहे. राज्यातलं सरकार हे स्वार्थी सरकार आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन सुळे यांनी यावेळी दिले.