जळगाव : मी हे मान्य करतो की गिरीशभाऊ दारू पीत नाही. तंबाखू खात नाही. बिडी पीत नाही. त्यांना कुठलीही सवय नाही. मात्र, त्यांना एक सवय आहे. त्यांची ती सवय सर्वांना माहीत आहे. त्यावर मी न बोललेले बरं, असी टीका एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. खडसे यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांच्या त्या सवयीवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन या दोन नेत्यांमधील वाद राज्यभर सतत चर्चेत असतो. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच आता गेल्या दोन, तीन दिवसांपासून या नेत्यांमधील वाद चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. असं असताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
गिरीश महाजन हा माणूस नुसता बडबड करणारा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला आहे. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व काहीच नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांना भाव देण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात षडयंत्र रचले होते. त्या सर्व प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार कोण आहे? हे महाराष्ट्राला माहितेय.
गिरीश महाजन म्हणतात, भोसरी भूखंडात खडसेंनी भूखंड घेतला. मात्र, आजही तुम्ही भोसरीचा उतारा काढू शकता मूळ मालकाचे नावच त्यावर दिसेल. मी महसूल मंत्री होतो. त्यामुळे मला तेवढी अक्कल होती. गिरीश महाजन यांनी भूखंडासंदर्भात दिलेली माहिती अत्यंत चुकीची असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आता म्हणता बोदवडमध्ये पाणी नाही. ती जबाबदारी तुमच्या आमदाराची आहे. काय करतोय तुमचा आमदार? असा प्रश्न उपस्थित करत आमदार चंद्रकांत पाटील यांना एकनाथ खडसे यांनी घेरले. तुमच्या आमदारानेच बोदवडमध्ये पाणी दिले नाही. ते म्हणतात, कोथळी ग्रामपंचायतीचा सरपंच तुमचा नाही. तर घ्या त्या सरपंचाची प्रतिक्रिया अन् विचारा त्यांना कुणाचा सरपंच आहे, असंही एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना सुनावले आहे.
तुम्ही म्हणता माझ्या बायकोला हरवले. तुम्ही गद्दारी करून हरवले आहे. बोदवड आणि मुक्ताईनगरनगर पंचायत ही माझी होती. परंतु तुम्ही फोडाफोडीचे राजकारण केले. पैशांचे आमिष देऊन त्या संस्था ताब्यात घेतल्या. आमच्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत एक सुद्धा माणूस तुमचा निवडून आला नाही. मी काय काम केले असे प्रश्न ते विचारत आहेत. तर जे धरणाचे काम उभे केले ते मी केले आहे. तुमच्या मतदारसंघातले धरण 100% नाथाभाऊंच्या कालखंडात झाले आहे. तुम्ही पाटबंधारे मंत्री होता तेव्हा काय दिवे लावले? असंही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.