नाशिक: जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२३) सकाळी ६ वाजेपर्यंत गंगापूर धरणात ३६.८२ टक्केसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु, दिवसभर संततधार पाऊस सुरुच राहिल्याने यात आणखी दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत आहे.
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम स्वरुपाच्या २४ धरणांमध्ये २९. ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मंगळवारी दिवसभरात शहरात २५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तर घोटीला ९१ मिलीमिटर, इगतपुरी १२३, त्र्यंबकेश्वर ८४, आंबोली ११२ मिलीमिटर पाऊस पडल्याने नैसर्गिक नाल्यांमधुन पाणी वाहु लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची पाऊले त्र्यंबकेश्वर व इगतपुरीच्या दिशेने वळू लागले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.