नाशिक : नाशिक तहसीलदारांनी पंचवटी परिसरात केलेल्या कारवाईत पाच लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. सोमवारी (दि. २९) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नाशिक- गुजरात महामार्गावर पेठ रोडवरील राऊ हॉटेलच्या चौकामध्ये खासगी वाहनाची तपासणी केली असता, धर्मेश सोलिया या व्यक्तीकडे ही रक्कम मिळाली. ही रक्कम कार्यालयीन व्यवहाराची असल्याचा दावा सोलिया यांनी केला आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस सोमवारी संपला. या दिवशी महाविकास आघाडी व काही अपक्षांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. निवडणूक पारदर्शी व्हावी यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच, आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात
आहे. एकीकडे अर्ज दाखल करण्याची धामधूम सुरू असताना जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिक तहसीलदार शोभा पुजारी यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या णारास नाशिक मध्य मतदारसंघातील गस्तीपथकाला मिळालेल्या माहितीनुसार, राऊ हॉटेलच्या चौकामध्ये संशयास्पदरीत्या जाणारे वाहन अडवून त्यातून पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली.