धुळे: धुळे जिल्ह्यात नामांकित जिंदाल स्टिल कंपनीच्या नावाचा शिक्का वापरुन येथील चाळीसगाव रोडवरील एका कारखान्यात लोखंडी पट्ट्या बनविण्याचा गैरप्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारखाना मालकाला ताब्यात घेतले आहे
धुळ्यातील शंभर फुटी रोडवरील कारखान्यात नामांकित जिंदाल स्टिल कंपनीच्या नावाचा शिक्का मारुन लोखंडी पट्ट्या बनविल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर अधीक्षक श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत निरीक्षक शिंदे, चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक अमरजित मोरे, हवालदार.मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, शोऐब बेग, राजू गिते यांच्या पथकासोबत संबंधित कारखान्यावर छापा टाकला.
त्यावेळी कारखान्यात घरात पीओपी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी पट्ट्या बनवून, त्या पट्ट्यांवर जिंदाल स्टिल कंपनीचा शिक्का मारला जात होता. यावेळी पोलिसांनी मालक मुक्तार खान शहजाद खान याला ताब्यात घेतले. हा तयार माल जिंदाल कंपनीच्या नावाने बाजारात विक्री केला जात होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.