लहू चव्हाण
पाचगणी : मौजे रूईघर (ता. जावळी) येथे वडिलोपार्जित मालकीच्या जमिनीवर गुंडांकरवी अतिक्रमण करून, दमदाटी करून, बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मेढा पोलीस ठाण्यात संबंधिताविरूद्ध तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल करूनही न्याय मिळत नसल्याने, या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा रूबाब दिलावर हेमानी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जावळी तालुक्यातील रुईघर येथे हेमानी यांची अंदाजे ६५ गुंठे जागा असून, सध्या ही जागा पडीक आहे. त्यांच्या जागेच्या शेजारीच समीर फत्ते शेख (रा. अंधेरी, मुंबई), आब्बू शोमा अनसारी (रा, माजगांव, मुंबई) व शाहीर अनसारी (रा. माजगांव, मुंबई) यांनी जागा घेतलेली आहे. हे बेकायदेशीरपणे दमदाटी, दादागिरी करून आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करत आहेत. इमरान मानकर (रा. वाई) याला हाताशी धरून नाहक त्रास देत आहेत. तर त्यांच्या जागेतील सिमेंटचे पोल व वॉल कंपाऊंड तोडून बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये शेकडो ब्रासचे उत्खनन केलेले आहे.
महाबळेश्वर आणि परिसरात नियमबाह्य उत्खनन आणि बांधकाम करण्यास बंदीचे आदेश असताना देखील संबंधित व्यक्ती बेकायदेशीर उत्खनन, बांधकाम तसेच कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत जावळी तहसिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा पोलीस ठाणे यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केल्यावर संबंधितांना त्यांनी तोंडी व लेखी सूचना दिली. मात्र, संबंधित व्यक्ती या गुंड प्रवृत्तीच्या असल्याने कायदा व पोलिसांना जुमानत नाहीत. तसेच संबंधित वाद हा महाबळेश्वर न्यायालयात प्रविष्ठ असूनही, संबंधित व्यक्ती बेकायदा कृत्य करून आम्हाला नाहक त्रास देत आहेत.
अशाच पद्धतीने अनेकदा तारेचे कंपाउंड तोडणे, सिमेंटचे पोल व वॉल कंपाऊंड तोडणे, अर्वाच्च आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणे, अंगावर धावून येणे, जिवे मारण्याची धमकी देणे, महिला वर्गास मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य करणे, असे प्रकार अनेकदा घडल्याने आपण आपल्या स्तरावर आदेश पारीत करून संबंधितांना बेकायेदशीर उत्खनन, बांधकाम, कब्जा घेणे, मालमत्तेचे नुकसान न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात यावी, अन्यथा आपल्या कार्यालयाबाहेर उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा या निवेदनात रूबाब दिलावर हेमानी यांनी दिला आहे.