जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे बेकायदेशीर पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यासह सहा शेतजमीन मालकांना तब्बल 137 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची नोटीस बजावण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी 6 ऑक्टोबर रोजी ही नोटीस बजावली असल्याची माहिती मिळत आहे.
मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह सहा जमीनमालकांना मुक्ताईनगर तहसीलदारांनी 6 ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य 26 कोटी 1 लाख 12 हजार 117 इतके आहे. यासाठी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार 137 कोटी 14 लाख 81 हजार 883 रुपयांचा दंड एवढा आकारण्यात आला आहे.
प्रकरण काय?
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात संबंधित मुद्दा उपस्थित केला होता. एकनाथ खडसे यांच्या परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर. जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. गौण खनिजासाठी अवैध उत्खनन करीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. राज्य सरकारने यासाठी एक एसआयटी स्थापन केली होती. या एसआयटीने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हेही वाचा: