नाशिक : कोरोनाकाळापासून महापालिकेच्या तिजोरीत भर पाडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. थकबाकी वसुलीवर जोर दिला जात असतानाच आता उत्पन्नाचे विविध स्त्रोतही शोधले जात आहेत. महापालिका प्रशासन मनपाच्या भूखंडासह इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी शोध घेतला जात आहे. याआधी जागा शोधण्याचे काम पालिका करणार होती. मात्र, आता मोबाईल टॉवरसाठी कंपन्याच जागांचा शोध घेणार आहे.
मालमत्ता कर व पाणीपट्टी बांधकाम परवानग्यांपोटी विकासशुल्क व केंद्राकडून मिळणारा जीएसटी परतावा हे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख मार्ग आहे. प्राप्त उत्पन्नापैकी 50 टक्क्यांहून अधिक रक्कम कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे व दैनंदिन खर्च भागविण्यावर होतो. उर्वरित रकमेत विकासकामांचा गाडा हाकावा लागतो. महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असून, विकासकामांसाठी तिजोरीत खडखडाट आहे.
पुढील आर्थिक संकटाची चाहूल पाहता मनपा प्रशासनाने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेत नागपुरच्या धर्तीवर मनपाच्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा व इमारतींचा शोध घ्या, अशा सूचना सर्वांना दिल्या होत्या. मात्र, आता या जागांचा शोध मोबाईल कंपन्याचे घेणार आहे.