धुळे: धुळे जिल्ह्यातील (Dhule Crime) सोनगीर परिसरात ऐन नवरात्रीच्या दिवसांत घडलेली घटना (Dhule News) संपूर्ण समाजाला हादरवणारी ठरली आहे. स्त्रीशक्तीचा गौरव केला जात असताना तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच लैंगिक अत्याचार केला. नवरात्रौत्सवात देवीची पूजा करून स्त्रीशक्तीला वंदन करणाऱ्या समाजाने जेव्हा अशा प्रकारची घटना ऐकली तेव्हा संतापाची लाट उसळली. आरोपी मयुर माळीला पोलिसांनी अटक केली असून, ग्रामस्थांनी मोर्चा काढून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

पीडित मुलीच्या आईने सोनगीर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 29 सप्टेंबरच्या सायंकाळी दुधवाला घरी आला होता. सासू दुध घेण्यासाठी गेल्या असताना तीन वर्षीय चिमुरडीदेखील त्यांच्यासोबत गेली होती. त्याच वेळी आरोपी चुलत काका मयुर माळी आला आणि तो मुलीला खेळविण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. त्यानंतर मुलगी घरी परत आली, मात्र रात्री झोपण्याच्या वेळी ती रडू लागली. चौकशी केल्यावर तिने आईला सांगितलं की, चुलत काकाने तिला आपल्या घरी नेऊन आतून दरवाजा बंद केला आणि तिच्यावर जबरदस्ती केली.

ही माहिती समजताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. तत्काळ त्यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मयुर माळीला तात्काळ अटक केली.

या घटनेनंतर सोनगीर परिसरात संताप उसळला. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सोनगीर पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. विशेष म्हणजे महिलांचा मोठा सहभाग या मोर्चात होता. मोर्चेकऱ्यांनी आरोपीला फाशी द्यावी, अशी जोरदार मागणी केली. “लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्याला समाजात राहण्याचा अधिकार नाही. अशा नराधमाला फाशीच हवी,” अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.
मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकला तेव्हा पी.आय. तुषार देवरे यांना निवेदन देण्यात आलं. ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, या प्रकरणात जलदगतीने कारवाई झाली नाही, तर मोठं आंदोलन उभारलं जाईल.
या घटनेमुळे धार्मिक-सामाजिक स्तरावरही संताप आहे. नवरात्रौत्सवात माता दुर्गेची पूजा करून कुमारीकन्येचा सन्मान करण्याची परंपरा आहे. पण याच काळात एका तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार होतो, ही बाब समाजाच्या अंतरात्म्याला हादरवणारी आहे. गावकऱ्यांनी हा विरोधाभास अधोरेखित करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.
सोनगीर पोलिसांनी या घटनेनंतर वेगाने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी जलदगतीने केली जात असून, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल.







