दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund News) तालुक्यात रावणगाव येथे बुधवारी (दि. 1) मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर काही वेळाने पतीने देखील स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिक यामागे अनेक तर्क वितर्क लावत आहेत.

नेमकं काय घडलं?

जयश्री गावडे (वय 45) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर तिच्या पतीचे नाव अशोक गावडे (वय 50) असं आहे. दोघेही पती-पत्नी शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अशोक गावडे यांनी पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर अशोक गावडे यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला असून, त्यांच्यामागे दोन मुले आहेत.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनेची माहिती दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.







