Crime News: नाशिक : शहरातील कामगार नगर परिसरात एका तरुणीला जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद राजभर आणि संबंधित तरुणी यांच्यात काही काळ प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाचा विचारही केला होता. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांनी या विवाहास नकार दिला. त्यानंतर तरुणीनेही संबंध तोडत त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. यामुळे आरोपी संतप्त झाला.
भररस्त्यात तरुणीचे अपहरण

रागाच्या भरात आरोपीने काही मित्रांच्या मदतीने तरुणीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. घटनेच्या दिवशी तरुणी कामगार नगर येथील एका किराणा दुकानात गेली असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिला रस्त्यात अडवले. तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरडाओरड केली. त्यामुळे संशयित तेथून पळून गेले.
आरोपीला अटक
या प्रकारानंतर तरुणीने पालकांसह सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी आनंद राजभर याला अटक केली. इतर तीन संशयितांचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. वैयक्तिक मतभेदातून अशा प्रकारे कायदा हातात घेणे गंभीर बाब असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरू आहे.






