मालेगाव : रेणुका सुत गिरणी कर्ज आणि फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांच्या जामीन अर्जावर सोमवारी मालेगावच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायलयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे. आता हिरे यांना जेल की बेल याचा निर्णय, मंगळवारी कोर्ट देणार आहे.
शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांचे वकील व जिल्हा बँक तसेच सरकारी वकिलांनी सोमवारी जामीन अर्जावर दोन तास युक्तिवाद केला. दोन्ही युक्तिवाद घेतल्यानंतर न्यायालय जामीन अर्जावर 2८ नोव्हेंबर रोजी निर्णय देणार आहे. या दरम्यान काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील, बेकायदेशीर झाल्या असतील तर त्याचा नक्कीच कोर्टाने विचार करावा. परंतु चौकशी पूर्ण झाली आहे. अनेक कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांचे जबाबही झाले आहेत. कागदपत्रे आणि प्रॉपर्टी पण सील केल्या आहेत. पुढे काही आणखी चौकशीचा काही मुद्दाच शिल्लक राहिलेले नसल्याने अद्वय हिरे यांना न्यायालय कायद्याच्या चौकटीत राहून नक्की जामीन देईल, असं ॲड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
आठ वर्ष जुनी केस
दरम्यान, जिल्हा बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असून न्यायव्यवस्थेचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ.अपूर्व प्रशांत हिरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप यापूर्वी अपूर्व हिरे यांनी केला होता.