नाशिक : नाशिकमध्ये घरात घुसून १८ वर्षीय तरुणाची धारदार शास्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना नाशिकच्या गंजमाळमधील पंचशीलनगरमध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पांडू शिंगाडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या गंजमाळमधील पंचशीलनगरमध्ये घरामध्ये झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली आहे. पांडू हा आपल्या मोठ्या भावासोबत घरामध्ये झोपलेला असताना मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पांडूचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून सकाळी पांडूची चुलत बहीण घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पांडूची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अज्ञात व्यक्ती विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घरात झोपलेल्या तरुणांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिंकामधे भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास भद्रकाली पोलिस करत आहे.