नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये बोलताना भुजबळांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर भाष्य केलं. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केल आहे.
बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षापासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षा देण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली होती याच्या तपास करायला पाहिजे होता. पोलीस काय करीत होते?, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे.
आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृण पणे हत्या करण्यात आली. मुंबई पोलिसासाठी हे एक आव्हान आहे. 10-20 हजारात ही पोरं हत्या करत आहेत. ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड द्यायला पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.