नाशिक : नाशिक पोलिस दलात एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. कर्तव्य बजावून घरी जात असतना एपीआय अधिकाऱ्याचा लष्करच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुंदन सोनोने असं पोलीस अधिकाऱ्याच नाव आहे.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोनोने कर्तव्य बजावून घरी जात असताना वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या टेम्पोचा सोनोनेंच्या दुचाकीला जोरदार धक्का लागल्याने सोनोने खाली पडून गंभीर जखमी झाले. लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलला दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने सोनोने कुटुंबासह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मागील तीन महिन्यांपासून एपीआय पदावर कुंदन सोनोने (रा. इंदिरानगर) कार्यरत होते. दिवसभरातील कर्तव्य बजावून झाल्यानंतर ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने घराकडे निघाले होते. दरम्यान, वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ सोनोने यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट लष्कराच्या ट्रकच्या चाकाच्या पाठीमागून खाली शिरली.
अपघात झाल्याचे लक्षात येताच चालकाने जागीच ब्रेक लगावला. यानंतर तत्काळ सोनोने यांना जवानांनी गाडीच्या बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने नाशिक पोलिस दलामध्ये तसेच परिसारत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. कुंदन सोनोने हे 2000 सालच्या बॅचचे अधिकारी असून गेल्या 23 वर्षांपासून ते पोलिस दलात कार्यरत होते.