मालेगाव : मालेगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने कंक्राळे येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा बसमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयश्री केदा कन्नोर (वय-१६, रा. कंक्राळे ता.मालेगाव ) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी केदा कन्नोर यांनी वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बस चालक व वाहक प्रशांत चव्हाण व नितीन शेवाळे यांच्याविरोधात विध्यार्थीनीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री ही दहावीची विद्यार्थिनी आहे. ती बसने शाळेत जात होती. बसमध्ये गर्दी असल्याने ती बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळच उभी होती. त्यावेळी गर्दीमुळे अचानक दरवाजा उघडल्याने ती दरवाजातून थेट बाहेर जमिनीवर पडली.
दरम्यान, बसमधून खाली पडलेल्या जयश्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला ग्रामस्थांनी तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांनी घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी केली. पुढील तपास वडनेर-खाकुर्डी पोलिस करीत आहेत.