Jalgaon News जैसलमेर : जळगावमधील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील सहा जणांचा राजस्थानमध्ये कार अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण अमळनेर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका शिक्षकांचे कुटुंबीय या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचे नातेवाईक घटनेची माहिती मिळताच राजस्थानकडे रवाना झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला निघाले होते. त्यावेळी कंटेनरला धडक लागून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे (वय 55, रा. बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे. ता. शिरपूर, हल्ली मुक्काम पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब एका गाडीत आणि दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब एक गाडीत अशा दोन चार चाकींमध्ये राजस्थान फिरायला गेले होते. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला त्यांच्या गाडीची धडक बसली. डोरीमना गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोनवणे आणि सांळुखे असलेल्या कारने एका कंटेनरला धडक दिली असल्याचे बोलले जात आहे.
या अपघातात धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (5 वर्षे) , गायत्री योगेश साळुंखे (वय 30), प्रशांत योगेश साळुंखे (वय 7), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय 1) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर सुरेखा या जखमी होत्या. त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. धोरिमाण्णा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह हे धोरिमान्ना हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, या मृतांचे मृतदेह मंगळवारी (दि. 14 नोव्हेंबर) धुळे जिल्ह्यात बेटावद आणि चीमथाणा येथे त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.