पिंपळगाव (नाशिक) : राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचाराने चांगला रंग पकडला आहे. प्रचारादरम्यान राजकीय नेते आरोप प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करत असताना दिसून येत आहे. अशातच महायुतीच्या सरकारने चांगलं काम केलं. काही राजकीय स्थित्यंतर घडली. यात एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली. त्यानंतर ते सरकारमध्ये गेले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये गेले. आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील ठरविले होते. पण त्यावेळी अशा काही घटना घडल्या त्यामुळे जमलं नाही; असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. नाशिकच्या पिपळगाव येथे आयोजित सभेदरम्यान अजित पवार बोलत होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, दिलीप बनकर यांना निवडुन आणा सर्व ताकदवान आपल्यासोबत आहे. राज्य, महायुती आणि आमचा उमेदवार काय करणार हा जाहिरनामा देत असून केद्र सरकार पाठिशी आहे. त्यामुळे तुमच्या सर्व योजना पूर्ण करू, असे आश्वासन सुद्धा अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादीच्या आमदारांचे देखील ठरले होते. माझ्यासह दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे आणि छगन भुजबळ आणि नितीन पवारांसह अनेकांच्या सह्या होत्या. पण त्यावेळी अशा काही घटना घडल्या, त्यामुळे जमलं नाही. पण कोरोनात वेळ गेला असे कार्यकर्ते आणि सहकारी सतत म्हणायचे.
सत्तेत असताना सव्वा रुपया दक्षिणाही..
लाडकी बहीण योजनेवर अनेकांकडून टीका करण्यात आली, आरोपही केले. महाराष्ट्र बिघडवीत आहेत, दिवाळखोरीत काढत आहेत; असे आरोप केले. पण मी आर्थिक शिस्तीचा माणूस आहे. यामुळे नियमात असेल तरच एकतो. यामुळे गरिबाला दिले. जातपात न बघत दिले. जी गरीब बहीण आहे, तिला लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला. आम्ही इतके दिवस सत्तेत होतो. आमच्याही लक्षात आले नाही हे दुर्दैव आहे. तुम्ही सत्तेत असताना सव्वा रुपया दक्षिणाही दिली नाही. पण आता आमच्या सरकारने थेट खात्यावर पैसे दिले आहेत. यात मध्यस्थी कोणीच ठेवला नाही. आचारसंहिता येणार म्हणून ऑक्टोबरमध्येच पैसे दिले. काळजी करू नका, पाच वर्षे योजना राबवायची असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ केले. साडेनऊ हजारात सोलर दिले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. यामुळे त्यांना रात्री शेतात जाण्याची गरज नाही. शेत शिवारात बिबट, रानडुक्कर, गवे येतात. यामुळे घरचे सुद्धा काळजीत असतात. अजितदादाचा वादा आहे, पुढील ५ वर्ष विजबिल माफ करणार. तसेच १ ऑक्टोबरपासून गायीच्या दुधाला ७ रुपये अनुदान दिले. शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पैसे देतोय. यात पारदर्शकता असून मध्ये कुठे गळती नाही. असेही अजित पवार बोलले.