Accident News: अहिल्यानगर : नवीन कार खरेदी केल्याचा आनंद साजरा करत शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. बुधवारी सायंकाळी खंडाळ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात (Accident) चव्हाण कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 2 लहान मुले आणि एक महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नव्या कोऱ्या कारला धडक
श्रीरामपूर येथील चव्हाण कुटुंबाने दोन दिवसांपूर्वीच नवी कार खरेदी केली होती. घरात उत्साहाचे वातावरण होते. गाडी घेतल्यानंतर साईबाबांच्या दर्शनाला जाऊनच तिचा वापर सुरू करायचा, असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी सर्वजण आनंदात शिर्डीकडे रवाना झाले. प्रवास सुरळीत सुरू असतानाच बाभळेश्वर-श्रीरामपूर रस्त्यावर खंडाळ्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
अपघातात ४ जणांचा मृत्यू
धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी ज्या घरात नवीन गाडीच्या आनंदात गोडधोड वाटले गेले होते, त्या घरावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी अवस्थेत असलेल्या 2 लहान मुलांना आणि एका महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदासाठी घेतलेली नवी गाडीच कुटुंबासाठी शेवटचा प्रवास ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






