Accident News: नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पिंपळगाव मोर जंक्शन परिसरात 17 जानेवारी रोजी सकाळी एक गंभीर अपघात (Accident) घडला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज शनिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये अपघाताची थरारक घटना स्पष्टपणे दिसत असून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोटी सिन्नर शिर्डी महामार्गावरून एक ट्रक वेगात जात होता. त्याच वेळी अचानक समोरून एक मोटारसायकलस्वार आल्याने ट्रक चालकाने त्याला वाचवण्यासाठी ब्रेक लावले आणि वाहन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेग अधिक असल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक रस्त्यावर उलटला आणि थेट रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसला.

या अपघातात ट्रकचे आणि हॉटेलच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाजूला उड्या मारल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
ट्रक चालक आणि त्याच्या सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. अपघातानंतर मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. ट्रकचा वेग, रस्त्याची अवस्था आणि वाहतूक नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास सुरू आहे. पिंपळगाव मोर जंक्शन हे नेहमीच वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.






