अहमदनगर : अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव डंपरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना ११ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाथर्डी येथे घडली. नितीन पवार असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेणुका पवार असं गंभीर जखमी झालेल्या त्याच्या पत्नीच नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगरच्या पाथर्डी येथे खडी वाहणाऱ्या विनाक्रंमाकच्या डंपरने दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. या घटनेत पतीचा जागेवरच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पाथर्डी- नगर रस्त्यावरील हॉटेल प्रशांत समोर ही घटना घडली. नितीन पवार हा शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील राहणारा आहे. तर त्याची पत्नी रेणुका पवार ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे या दांपत्याचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.
दरम्यान, या अपघातातनंतर धडक दिलेला डंपर देखील उलटला असून डंपर चालक फरार झाला आहे. विना क्रमांकाचा डंपर असल्याने हा डंपर नेमका कुणाच्या मालकीचा आहे? हे पोलीस तपासानंतर समजणार आहे. या घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.